- मराठा सेवा संघातर्फे यंदा सहा जूनला कालाआम-पानीपत (हरियाना) येथे 336 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये शिवराज्याभिषेक रायगडावर करण्यात आला होता. त्या स्मृतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन येते.
यावर्षी हा कार्यक्रम पानीपत येथे होणार आहे. कार्यक्रमास हरियानाचे मुख्यमंत्री भुपेद्रसिंग हूड्डा, स्थानीक नेते विरेंद्रवर्मा यांची प्रमूख उपस्थिती या कार्यक्रमास लाभेल. महाराष्ट्रातून या सोहळ्यास अनेक जण सहभागी होणार आहे. ज्यांना या सोहळ्यास उपस्थित राहायचे असेल त्यांनी डॉ. शिवाजी झांबोडे (09812063521), डॉ. मांगेरामजी चोपडे (09215350516) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्याने रायगडाला आली पुन्हा जाग!
रायगड - शिवभक्तांच्या भावनांशी खेळाल, तर पुरातत्त्व खाते गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिला. शिवछत्रपतींच्या कोणत्याही गडावर उत्सव साजरा करण्यासाठी यापुढे परवानगी मागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी शिवराज्याभिषेक सोहळ्यास केंद्र सरकारकडून परवानगी मिळवून आणल्याबद्दल युवराज संभाजीराजे छत्रपती यांना तमाम शिवभक्तांतर्फे श्री. ठाकरे व राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते चांदीची तलवार देऊन गौरविण्यात आले. तसेच ठाकरे यांच्या हस्ते समितीचे अध्यक्ष इंद्रजित सावंत यांच्या "प्रतापगडाची जीवनगाथा' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी गडावरील राजदरबार जय भवानी जय शिवाजी जयघोषाने दणाणून गेला. ठाकरे म्हणाले, "पुरातत्त्व खात्याने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी परवानगी नाकारली आणि तमाम शिवभक्तांनी खात्याला सडेतोड उत्तर दिले. वाघाला डिवचण्याची हिंमत कराल तर हे असेच होणार. पुरातत्त्व खात्याने रखवालदाराचे काम करावे. मालकाचा आव आणू नये. शिवभक्तांच्या भावनांशी खेळण्याचा नाहक उद्योगही करू नये.'' ते म्हणाले, ""ज्यांनी अफझलखानाचे पोट फाडले, शाहिस्तेखानाची बोटे तोडली, औरंगजेबाला पळताभुई थोडी केली, त्या शिवछत्रपतींच्या सोहळ्यास परवानगी नाकारून, पुरातत्त्व खाते औरंगजेबाप्रमाणे वागत आहे. पुरातत्त्व खाते असेच वागणार असेल, तर अधिकाऱ्यांना गडावर फिरकूही देणार नाही. हिंमत असेल, तर अधिकाऱ्यांनी हे धाडस करून बघावे. गडावरील दगड, माती हे शिवभक्तांसाठी अमृतासमान आहे. त्यांच्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नका; अन्यथा टकमक टोक दाखविल्याशिवाय राहणार नाही.'' संभाजीराजे म्हणाले, "शिवराज्याभिषेक सोहळ्यात तारीख व तिथीचा वाद होणे चुकीचे आहे. शिवछत्रपतींचे कार्य जगभर पोचवायचे असेल, तर राष्ट्रीय सण म्हणून हा सोहळा सहा जूनला साजरा झाला पाहिजे. यंदा सोहळ्यास परवानगी नाकारल्याने, तमाम शिवभक्त संतप्त झाले होते; मात्र मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने सोहळा सुकर झाला.'' श्री. तटकरे म्हणाले, ""पुढच्या पिढीला शिवछत्रपतींचा इतिहास कळायला हवा. त्याकरिता तमाम शिवभक्तांच्या पाठबळावर सरकारच्या वतीने राष्ट्रीय सण म्हणून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास प्रयत्नशील राहणार आहे.'' मिशन रायगड ...युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ""रायगडाचे वैभव जपण्याकरिता रायगड मिशन सुरू करायला हवे. त्याची जबाबदारी मी स्वीकारतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी रायगडाचे महत्त्व जगभर जाणे आवश्यक आहे; तसेच यापुढे शिवछत्रपतींची ओळख महामानव म्हणून करणे शिवभक्तांचे कर्तव्य आहे.'' या वेळी संभाजीराजे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व प्रबोधनकार ठाकरे, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व स्वतःचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे स्पष्ट केले.
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे`
सुनील पाटकर - सकाळ वृत्तसेवामहाड - "जय भवानी, जय शिवाजी'चा दुमदुमणारा जयजयकार.... अंगात स्फूर्ती जागविणारे बहारदार पोवाडे, शौर्याचे प्रतीक असलेले मर्दानी खेळ आणि हजारो शिवभक्तांचा लोटलेला सागर... रायगडावर जणू शिवकालच जिवंत झाला होता. शिवभक्तांच्या ओतप्रोत वाहणाऱ्या जल्लोषात रायगडावर रविवारी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात पार पडला. रायगडही या उत्साहाने आणि शिवराज्याभिषेकाच्या त्या स्मृतींनी थरारला असेल. वादाच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यास दिलेली परवानगी यामुळे आधीच शिवप्रेमींच्या उत्साहाचा सागर उसळला होता. ढगांनी आच्छादलेली चादर आणि पावसाने लावलेली हजेरी यातही शिवप्रेमींचा हाच उत्साह टिकून होता. कुंद धुक्यांनी नटून गेलेला रायगड पूर्णपणे शिवभक्तांनी ओसंडून गेला होता. शनिवारी सायंकाळपासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आलेल्या शिवप्रेमींनी गडावर हजेरी लावली होती. पाचाड, रायगड रोपवे व रायगडचा पायथा हजारांहून अधिक वाहनांनी भरून गेला होता. वाहने वळविण्यासाठीही जागा नव्हती. चित्तदरवाजापासून कोल्हापूर, सातारा, अकोला, पुणे, मुंबई या भागातून आलेले शिवप्रेमी खांद्यावर भगवा झेंडा घेऊन शिवाजी महाराजांचा जयजयकार करत गड सर करत होते. रोपवेलाही गडावर जाण्यासाठी तुफान गर्दी होती. रायगड व परिसरात जेथे जेथे जागा मिळेल त्या त्या ठिकाणी शिवप्रेमींनी गटागटाने वास्तव्य केले होते. महाड शहराजवळील करंजखोलपासून रायगड किल्ल्यापर्यंतच्या 25 किलोमीटर अंतरामध्ये मंदिरे, समाज मंदिरे, सभागृह, खासगी घरे, मोकळी जागा अगदी गाडीतही शिवप्रेमींनी मुक्काम केला होता. रायगड किल्ल्यावर काल मध्यरात्रीच पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी राज्याभिषेक सोहळ्यापूर्वीही पाऊस हलकेच हजेरी लावून गेला. गांधारी नदी व परिसरातील नद्यांवर शिवप्रेमींची स्नानासाठी गर्दी झाली होती. पाचाड, रायगड परिसरातील हॉटेल्सही भरून गेली होती. काही जण छत्रपती शिवरायांच्या पोषाखात गडावर आले होते. त्यांना पाहून प्रत्यक्ष शिवकालातच असल्यासारखे भासत होते. मावळ्यांचा पोषाख केलेले, हाती तलवार व पाठीवर ढाल घेऊन चालणारे शिवप्रेमी आणि पारंपरिक वेष धारण केलेल्या महिलांचीही कमतरता नव्हती. गडावर चौघडे झडत होते. ढोल-ताशे वाजत होते. अनेक ठिकाणांहून आलेली वाद्यपथके होळीच्या माळावर बेभान होऊन वाद्ये वाजवत होती. राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी शाहिरांनी सादर केलेल्या पोवाड्यांना शिवप्रेमींनी मोठी दाद दिली. "अंधार झाला आता, दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे' या शाहिरी गीतावर शिवप्रेमी उत्साहाने नाचू लागले. सकाळी 5.30 वाजता ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीराजांच्या प्रमुख उपस्थितीत शिवमूर्तीची पालखी वाजत गाजत राजदरबारात आणण्यात आली. या ठिकाणी संभाजी राजांच्या हस्ते शिवमूर्तीवर सुवर्ण नाण्यांचा व जलाचा अभिषेक करण्यात आला. यानंतर उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच गडावर चैतन्य पसरले. शिवप्रेमींनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. याप्रसंगीं अर्थमंत्री सुनील तटकरे, परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कमांडोच्या वेषात आलेले आमदार वंजाळे, आमदार भरत गोगावले, इंद्रजीत सावंत, मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव उपस्थित होते. राज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजी राजांच्या उपस्थितीत शिवरायांची पालखी जगदिश्वर मंदिराकडे नेण्यात आली. या वेळी शिवप्रेमींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
सरकारच्या निर्णयाचे संभाजी ब्रिगेडकडून स्वागत
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 02, 2010 AT 07:18 PM (IST)
पुणे - रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आंदोलन मागे घेतले. फटाके वाजवून आणि पेढेवाटप करून निर्णयाचे स्वागत करण्यात आले. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने सर्व ऐतिहासिक स्थळांवर कार्यक्रम करण्यास मनाई केली आहे. या निर्णयाविरुद्ध आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात 'संभाजी ब्रिगेड'तर्फे धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. जंगली महाराज रस्त्यावरील पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू झाले. या वेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सारिका भोसले, शांताराम कुंजीर, संजयसिंह शिरोळे, संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, ज्योतिबा नरवडे आदी उपस्थित होते.दरम्यान, राज्य सरकारने रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा करण्यास परवानगी दिली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. उशिरा का होईना, पण लोकभावनेचा आदर करून निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात आले. फटाके वाजवून आणि पेढे वाटून आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
शिवराज्याभिषेक साजरा करणारच..
सकाळ वृत्तसेवा
Monday, May 31, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: shivrajyabhishek, shivsena, kolhapur, western maharashtra
कोल्हापूर - केंद्र आणि राज्य शासनाला सांगली-मिरज दंगलीची पुनरावृत्ती होऊ नये असे वाटत असेल, तर रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी घातलेली बंदी त्वरित उठवावी. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत सोहळा साजरा केला जाईल, असा इशारा शहर -जिल्हा शिवसेनेतर्फे आज देण्यात आला. बंदीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेने आज सकाळी जोरदार निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांना निवेदन दिले.केंद्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याने तीस मार्चच्या निर्णयानुसार रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास परवानगी नाकारली आहे. त्याचे पडसाद शिवप्रेमींमध्ये उमटू लागले असून आज शहर व जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून संताप व्यक्त केला. केंद्र, राज्य शासन व पुरातत्व खात्याच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. केंद्र शासन महाराष्ट्राबद्दल नेहमीच आकसाने वागत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम माहीत नसणाऱ्या अधिकाऱ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याला परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा आकस त्यांनी दाखवून दिला आहे. वर्षानुवर्षे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. हजारो शिवप्रेमी रायगडावर जमतात. असे असताना त्यांच्या भावना दुखवण्याचे धाडस केंद्र शासनाने केले आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांच्याच सोहळ्याला बंदी घालणे हे दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया या वेळी व्यक्त करण्यात आल्या. प्रतापगडावर अफझलखानचा ऊरूस साजरा केला जातो. त्याला बंदी घातली जात नाही, पण छत्रपतींच्या कार्यक्रमावर बंदी घालून अन्याय केला जात आहे. शासनाने घातलेली ही बंदी मागे घेऊन शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा पोलिसच काय, सैन्य दल बोलावले तरी रायगडावर सोहळा साजरा केला जाईल. पुरातत्व खात्याने रायगडावर सोहळ्यास परवानगी नाकारली आहेच शिवाय ऐतिहासिक वास्तूपासून शंभर मीटर अंतरावर कोणताही फेरफार करू नये, तसेच महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही किल्ल्यावर कार्यक्रम करण्यास मनाई केली आहे. त्याचा निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा जुलमी आदेश त्वरित मागे घ्यावा अन्यथा कायदा मोडून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाईल, असा इशाराही त्यात दिला आहे.आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, विजय देवणे, प्रा. विजय कुलकर्णी यांच्यासह अनेक शिवसैनिक निदर्शनात सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment