Wednesday, June 2, 2010

रायगडावर होणारच शिवराज्याभिषेक सोहळा !!!


रायगडावरील शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याला पंतप्रधान कार्यालयाने आज (बुधवार) परवानगी दिली. यासंदर्भातील अनुमतीचे पत्र आजच पंतप्रधान कार्यालयातून आल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या साप्ताहिक बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 1958च्या कायद्यानुसार पुरातत्व खात्याच्या अधिक्षकांकडे परवानगीचे अधिकार होते. मात्र, या कायद्यात बदल झाल्याने ते अधिकार केंद्र सरकारला प्राप्त झाले. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी केंद्र सरकारची अनुमती आवश्‍यक होती असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रायगडावरील शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याला परवानगी मिळण्याबाबत कालच पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिण्यात आले होते तसेच दूरध्वनीद्वारे चर्चादेखील केली होती. त्याला अनुसरून पंतप्रधान कार्यालयातून या सोहळ्याला अनुमती देण्यात आल्याचे पत्र आज मिळाले अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यापुढे दरवर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी कायमस्वरूपी अनुमती असावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असून त्यामुळे या सोहळ्यासाठी दरवर्षी परवानगी घेण्याचा प्रश्‍नच निर्माण होणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रायगडावर येत्या सहा जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास पुरतत्वविषयक कायद्यातील बदलांमुळे बंदी आली होती. पुरातत्त्व खात्याच्या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले होते. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाच्या निषेध करीत राज्याभिषकाचा सोहळा रायगडावर पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करीत, सरकारला आव्हान दिले होते. शिवभक्त दरवर्षी मोठ्या उत्साहाने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात. यंदाही समितीतर्फे सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे, पण पुरातत्त्व खात्याच्या निर्णयामुळे शिवभक्त सैरभैर झाले होते.राज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात केंद्रसरकारशी चर्चा करून या सोहळ्यासाठी परवानगी मिळवून देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी काल (मंगळवार) "सकाळ'शी बोलताना दिली होती.

पंतप्रधानांशी चर्चा करून राज्याभिषेकाला परवानगी देऊ - मुख्यमंत्री
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 02, 2010 AT 12:19 AM (IST)
मुंबई - रायगडावरील शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात केंद्रसरकारशी चर्चा करून या सोहळ्यासाठी परवानगी मिळवून देवू अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दै. सकाळशी बोलताना दिली. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, दरवर्षी राज्याभिषेकाचा सोहळा होतो. तसा व्हायला काही हरकत नाही. राज्यभिषेक व्हावा ही मागणी काही चुकीची आहे, असे मला वाटत नाही. त्यात काही आक्षपार्ह आहे, असेही मला वाटत नाही. परंतू केंद्राच्या कायद्याच्या अखत्यारित हा प्रश्‍न आलेला आहे. त्यामुळे मी स्वतः पंतप्रधान कार्यालयाशी या संदर्भात चर्चा करीन आणि राज्याभिषेक सोहळ्याला परवानगी मिळवून देण्याचा प्रयत्न करीन, अशी सकारात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली. केंद्रीय पूरातत्व खात्याने रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरातील शिवाजी पेठेत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. पुरातत्व विभागाच्या या निर्णयाच्याविरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी या निर्णयाचा निषेध करीत राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावरच पार पाडण्याचा निर्धार व्यक्त सरकारला आव्हान दिले आहे.

No comments: