Monday, June 8, 2009

शिवरायांचा पुतळा काढल्यास रक्ताचे पाट
रायगड - शिवछत्रपतींचा मेघडंबरीत बसविलेला पुतळा पुन्हा न हलविण्याचा पवित्रा घेत दुर्गराज रायगडावरील राजदरबारात शिवप्रेमींनी आज संताप व्यक्त केला. तत्त्वतः मान्यता मिळूनही रीतसर पुतळ्याची प्रतिष्ठापना न केल्याबद्दल शिवप्रेमींनी राज्य शासनाचा धिक्कार केला. "मेघडंबरीतील पुतळा काढल्यास रक्ताचे पाट वाहतील' व "पुतळ्याला हात लावणाऱ्यांचे हात तोडू' असा इशारा देत शिवप्रेमींनी राजसदरेसमोर जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे पाऊण तास येथे तणावाचे वातावरण होते.
शिवप्रेमींचा वाढता संताप पाहता कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांनी येत्या सोमवारी (ता. ८) मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यासंदर्भात तातडीची बैठक बोलाविली असल्याचे सांगितले. मात्र मुख्यमंत्र्यांचा निर्णय ऐकून न घेण्याच्या मनःस्थितीत असलेल्या शिवप्रेमींचा पुन्हा उद्रेक झाला आणि त्यांनी शासनाविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी "मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास ठेवू नका, डोळे उघडे ठेवा' असा संदेश शिवप्रेमींना दिला. मेघडंबरीत बसविलेला पुतळा प्रशासन राज्याभिषेक सोहळ्यानंतर काढणार होते, त्याची माहिती शिवप्रेमींना आज समजली. तत्त्वतः मान्यता मिळूनही सुमारे एक वर्ष शासनाने पुतळा बसविण्यास चालढकल केल्याने शिवप्रेमी अगोदरच संतप्त होते. त्यातच शासनाच्या पुतळा काढण्याच्या निर्णयाबद्दल त्यांच्यातून संतप्त भावना व्यक्त झाल्या.राजसदरेवर युवराज संभाजीराजे यांनी शिवप्रेमींना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ""ऐतिहासिक संदर्भानुसार पुतळा तयार केला आहे. लोकवर्गणीतून तो तयार केला असून अप्रतिम झाला आहे. शिवराज्याभिषेक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा, असा प्रयत्न चालला असताना पुतळ्याबाबत मात्र शासनाची उदासीनता स्पष्ट दिसत आहे. पुतळा बसविण्याच्या संदर्भात झालेल्या पाच बैठकांत तोच विषय पुनःपुन्हा चर्चिला गेला आहे. राज्याभिषेकानंतर हा पुतळा मेघडंबरीतून हलविण्याचा शासनाचा घाट आहे.'' यावर उपस्थित शिवप्रेमींनी "राज्य शासनाचं करायंच काय, खाली डोकं वर पाय' अशी टीकात्मक घोषणाबाजी केली. यावेळी शिवप्रेमींनी कोणत्याही परिस्थितीत पुतळा हलविला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. काहींनी राजसदरेकडे जात गोंधळ घातला. त्यामुळे आमदार माणिकराव जगताप यांनी थेट या विषयावर मोबाईलद्वारे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. झालेली चर्चा सांगण्यास ते शिवप्रेमींसमोर आले. पण त्यांचे कोणीच काही ऐकले नाही. अखेर संभाजीराजे यांनी पुन्हा शिवप्रेमींना शांत केले व पुतळ्याबाबत निर्णय घेण्यास सोमवारी बैठकीस आमंत्रित केल्याचे सांगितले. तरीही शिवप्रेमी पुतळा हटविणार नसल्याच्याच पवित्र्यात होते. या प्रसंगी श्री. खेडेकर म्हणाले, ""हा पुतळा आता शिवभक्तांचा आहे. ती शिवप्रेमींची मालमत्ता आहे. संभाजीराजेंनी ती शिवभक्तांना अर्पण केली आहे. त्यामुळे ती आता शिवप्रेमींची झाली असून निर्णय शिवप्रेमींनाच घ्यावा लागेल.'' त्यावर शिवप्रेमींनी टाळ्यांचा कडकडाट केला. "जो हमसे टकरायेगा मिट्टी में मिल जाएगा' अशी घोषणाबाजी केली. संभाजीराजे यांनी पुतळा हटविला जाणार नाही, असा येथे इशारा दिला. खेडेकर यांनी शिवप्रेमींनी डोळ्यांत तेल घालून पुतळ्याची देखभाल करावी, असे शिवप्रेमींना सांगितले आणि "जय भवानी जय शिवाजी'च्या जयघोषात राजदरबार दुमदुमून गेला.