Thursday, June 12, 2008

शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगड , ता. ४ - "जय भवानी जय शिवाजी'च्या जयघोषात दुर्गराज किल्ले रायगडावर संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त दाखल होत आहेत.कोल्हापूरसह मुंबई, ठाणे, पुणे येथील हजारो शिवभक्तांचे आज उत्साही वातावरणात येथे आगमन झाले आहे. येथील विविध ऐतिहासिक स्थळांच्या सजावटीला वेग आला असून शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगड सज्ज झाला आहे. दरम्यान, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीने गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज सकाळपासूनच गडावर शिवभक्तांची रेलचेल सुरू झाली. पायथ्यापासून चालत शिवभक्तांनी गडावर प्रवेश केला. "शूर आम्ही सरदार,' "वेडात मराठे वीर दौडले सात,' "जय जय महाराष्ट्र माझा,' ही गीते गात गडावर चढताना शिवभक्तांचा उत्साह अधिकच दुणावत गेला. काही वयोवृद्ध शिवभक्त रोप-वेमधून गडावर पोहोचले. गडावरील ऐतिहासिक वास्तू, त्यांचे महत्त्व, शिवकालातील त्यांची स्थिती याची माहिती शिवभक्तांनी आज घेतली. दरम्यान, समितीच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी मेघडंबरी, नगारखाना, शिरकाई मंदिर, जगदीश्‍वर मंदिर यांची सजावट करण्यास सुरवात केली. उद्या (ता.५) सकाळी सहा वाजता महाड येथून कोल्हापूरच्या शिवगर्जना मर्दानी खेळाचा आखाड्याचा प्रकाश माने विटा फेक उपक्रम करणार आहे. कोल्हापूरहून येणाऱ्या शिवभक्तांची संख्या लक्षणीय असून ते सकाळी गडावर दाखल होतील. समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे उद्या गडावर दाखल होतील. त्यांच्या उपस्थितीत होळीच्या माळावर शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होतील. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी अन्नछत्राची सोय करण्यात आली आहे.

No comments: