Thursday, June 12, 2008

छत्रपतींच्या शिवराज्याभिषेकाच्या पुर्वी इतिहासपुरूष व नियती ह्या दोघांमध्ये काय संवाद रंगला असावा बरं...?

ऐकायचाय का ?
मदन पाटील यांच्या "जिजाऊसाहेब" ह्या कादंबरीतील शिवराज्याभिषेकाच्या पुर्विच्या ऐतिहासिक परीस्थितिचा मागोवा घेणारा हा संवाद नियति व इतिहासपुरूष ह्यांच्या शब्दात ......
शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगड , ता. ४ - "जय भवानी जय शिवाजी'च्या जयघोषात दुर्गराज किल्ले रायगडावर संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त दाखल होत आहेत.कोल्हापूरसह मुंबई, ठाणे, पुणे येथील हजारो शिवभक्तांचे आज उत्साही वातावरणात येथे आगमन झाले आहे. येथील विविध ऐतिहासिक स्थळांच्या सजावटीला वेग आला असून शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगड सज्ज झाला आहे. दरम्यान, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीने गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज सकाळपासूनच गडावर शिवभक्तांची रेलचेल सुरू झाली. पायथ्यापासून चालत शिवभक्तांनी गडावर प्रवेश केला. "शूर आम्ही सरदार,' "वेडात मराठे वीर दौडले सात,' "जय जय महाराष्ट्र माझा,' ही गीते गात गडावर चढताना शिवभक्तांचा उत्साह अधिकच दुणावत गेला. काही वयोवृद्ध शिवभक्त रोप-वेमधून गडावर पोहोचले. गडावरील ऐतिहासिक वास्तू, त्यांचे महत्त्व, शिवकालातील त्यांची स्थिती याची माहिती शिवभक्तांनी आज घेतली. दरम्यान, समितीच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी मेघडंबरी, नगारखाना, शिरकाई मंदिर, जगदीश्‍वर मंदिर यांची सजावट करण्यास सुरवात केली. उद्या (ता.५) सकाळी सहा वाजता महाड येथून कोल्हापूरच्या शिवगर्जना मर्दानी खेळाचा आखाड्याचा प्रकाश माने विटा फेक उपक्रम करणार आहे. कोल्हापूरहून येणाऱ्या शिवभक्तांची संख्या लक्षणीय असून ते सकाळी गडावर दाखल होतील. समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे उद्या गडावर दाखल होतील. त्यांच्या उपस्थितीत होळीच्या माळावर शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होतील. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी अन्नछत्राची सोय करण्यात आली आहे.

shivrajyabhishek

6 june:-shivrajyabhishek celebrated on raigad

रायगडावर शिवभक्तांची मांदियाळी
शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३३५ वर्ष पूर्ण
तुताऱ्यांचा निनाद... ढोल-ताशांचा गजर... मंगलमय सूरांची उधळण... छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार... फटाक्‍यांची आतषबाजी... फुलांचा वर्षाव... टाळ्यांचा कडकडाट...
शिवछत्रपतींच्या जयघोषात रायगड दुमदुमला
ढोल-ताशांचा कडकडाट आणि शिवरायांच्या जयजयकाराने सारा आसमंत दुमदुमून गेला. युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन झाले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीने तीन दिवस शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले होते. काल (गुरुवार) रात्री मेघडंबरीत छत्रपती शिवरायांची मूर्ती बसवण्यात आली. त्यामुळे शिवभक्तांनी आज पहाटेपासून राजसदरेकडे धाव घेतली.

दाट धुके व जोरदार पाऊस असूनही दरबाराचा परिसर शिवभक्तांनी फुलून गेला. गडावर लावलेल्या भगव्या ध्वजांमुळे शिवमय वातावरण निर्माण झाले. सकाळी समितीच्या कार्यकर्त्यांनी राजसदर व मिरवणुकीसाठी पालखीची सजावट केली. साडेनऊ वाजता शिवछत्रपतींची मूर्ती असलेली ही पालखी ढोल-ताशांच्या कडकडाटात राजसदरेकडे नेण्यात आली. या मूर्तीचे पूजन संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांच्या हस्ते मेघडंबरीतील मूर्तीस शिवछत्रपतींची मुद्रा असलेल्या नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी युवराज संभाजीराजे म्हणाले, ""पुरातत्व खात्याने राजसदरेवर चौथरा बांधला. मेघडंबरी उभी केली; पण त्यात शिवमूर्तीची प्रतिष्ठापना झाली नव्हती. त्यामुळे केंद्रीय पर्यटनमंत्री अंबिका सोनी व पुरातत्व खात्याकडे आम्ही मूर्ती बसविण्यासाठी गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याशीही याबाबत संपर्क साधला. मूर्ती बसविण्यास परवानगी दिली नाही, तर आम्ही रायगडावरून खाली उतरणार नाही, असा त्यांना इशारा दिला होता. यात पुरातत्व खात्याचे चालढकल धोरण आडवे येत होते. त्यामुळे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या माध्यमातून आम्ही मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प केला. या संकल्पाच्या पूर्तीवेळी हजारोंच्या संख्येने तुम्ही येथे उपस्थित राहिलात व त्याचाच परिणाम म्हणून केंद्र, राज्य व पुरातत्व विभागाने मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी परवानगी दिली. येत्या काही महिन्यांत या मूर्तीची सन्मानाने प्रतिष्ठापना करण्यात येईल; मात्र छत्रपती शिवराय हे राष्ट्रपुरुष असल्याने या मूर्तीची प्रतिष्ठापना राष्ट्रपतींच्या हस्तेच व्हावी, अशी आमची इच्छा आहे.'' संभाजीराजे यांच्या भाषणानंतर "जय भवानी जय शिवाजी'च्या जयघोषाने शिवभक्तांनी परिसर दणाणून सोडला. शिवमूर्तीचे दर्शन घेण्यास शिवभक्तांची गर्दी झाली. त्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांची शिवभक्तांना आवरताना तारांबळ उडाली. त्यानंतर पालखी मिरवणूक नगारखान्यातून होळीच्या माळावर नेण्यात आली. या ठिकाणी शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे संभाजीराजे यांनी पूजन केले. येथे शिवशाहीर दिलीप सावंत यांनी पोवाडा सादर केला. या ठिकाणी पट्टा, लाठी, तलवार, फरी गदगा, बाणा, भाला या शस्त्रांची प्रात्यक्षिके सादर झाली. त्यानंतर जगदीश्‍वर मंदिराकडे पालखीची रवानगी झाली. शिवसमाधीजवळ मिरवणुकीची सांगता झाली.
यावेळी आमदार मुजफ्फर हुसेन, महाड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती भरतशेठ गोगावले, कोल्हापूरचे महापौर उदय साळोखे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. वसंतराव मोरे, शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश जाधव, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, पुरुषोत्तम खेडेकर, हेमंत साळोखे, संजय पवार, हिंदकेसरी विष्णू जोशीलकर, सुशांत वाघचोरे, प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे, नगरसेवक उत्तम कोराणे, ईश्‍वर परमार, महेश सावंत, शाहीर शहाजी माळी, फत्तेसिंह सावंत, राहुल मगदूम, डॉ. हरिष पाटील, नगरसेवक सुहास पाटील, नरेंद्र इनामदार, संभाजी साळोखे, सुरेश पाटील, पुंडलिक जाधव, संजय साळोखे, रमेश वांजळे, उदय घोरपडे, अमित पाटील, अजित पाटील आदी उपस्थित होते. रुबाबदार बाराबंदीच्या पोशाखात मिरवणुकीत सामील होऊन शिवभक्तांनी सोहळ्याची रंगत वाढवली. कोल्हापूरहून आलेल्या महिलाही पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झाल्या. लहान मुले-मुलीही ऐतिहासिक वेशभूषेत उपस्थित होती.
समाधान
काल रात्री मेघडंबरीत मूर्ती बसविण्यात आली. या घटनेचे साक्षीदार मोजक्‍याच शिवभक्तांना होता आले; मात्र आज याच मूर्तीचे संभाजीराजे यांच्या हस्ते पूजन होतानाचा साक्षीदार झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
अन्नछत्र
समितीने शिवभक्तांसाठी अन्नछत्राची सोय केली होती. त्याचा सुमारे पंचवीस हजार शिवभक्तांनी लाभ घेतला. मिरवणुकीची सांगता होताच, मुसळधार पावसात शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठी रांग लावली. स्थानिक रहिवासीही रायगडाच्या पंचक्रोशीतील रहिवाशांनी यंदा प्रथमच मोठ्या संख्येने शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभाग घेतला. गडावरील आवकीरकर कुटुंबीयही आवर्जुन उपस्थित होते. गेली अनेक पिढ्या ते रायगडचे रहिवासी आहेत.

एक नजर...
* होळीच्या माळावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास छत्र बसविण्यास शासनाची परवानगी
* शिवराज्याभिषेक दिनोत्सवात आमदार मालोजीराजे यांचा उत्साही सहभाग
* कर्नाटकातून आलेल्या पाचशे कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा
* युवराज संभाजीराजे यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे (शाखा नाशिक) आनंद भट्टड यांच्या हस्ते सत्कार
* गडावर प्रचंड पोलिस बंदोबस्त
* मुसळधार पावसातही शिवकालीन युद्धकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके
* शिवराज्याभिषेक दिनोत्सवास लोकोत्सवाचे स्वरूप

visit

-www.shivdharma.com