Tuesday, April 19, 2011

Shivrajyabhishek 6 June 2011

रायगडावरील शिवराज्याभिषेक यंदापासून शासनातर्फे..
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, April 19, 2011 AT 08:28 AM (IST)

पुणे - तमाम शिवभक्तांची पंढरी असणाऱ्या रायगडावर या वर्षीपासून शिवराज्याभिषेक उत्सव शासनातर्फे साजरा केला जाईल, अशी घोषणा राज्याचे जलसंपदामंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी सोमवारी केली. शिवराज्याभिषेक व शिवपुण्यतिथीला एकत्र येत राज्यभरातील शिवप्रेमी रायगडावर इतिहासाचा जागर मांडतात. तटकरे यांच्या घोषणेने "शासनाला जेव्हा जाग येते' अशीच भावना गडावर जमलेल्या शिवप्रेमींनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 331व्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक स्थापित "श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा'तर्फे आयोजिण्यात आलेल्या शिवपुण्यतिथी कार्यक्रमात तटकरे बोलत होते. आमदार भरत गोगावले, शिवसंग्रामचे विनायक मेटे, मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, कार्यवाह सुधीर थोरात, शाहीर योगेश, सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयवंत मोहिते, अमित बर्वे या प्रसंगी उपस्थित होते. तटकरे म्हणाले, ""दुर्ग शिवनेरीवर शिवजन्मोत्सव शासनातर्फे साजरा केला जातो. त्याच धर्तीवर या वर्षीपासून शासनातर्फे शिवराज्याभिषेक साजरा केला जाईल. पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात किल्ले व स्मारके असल्याने शासनाला काही करता येत नाही. गेल्या अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे रायगडाच्या परिसरात शिवसृष्टी उभारण्याचा प्रकल्प लवकरच सुरू केला जाणार आहे. रायगड हा शौर्याचे प्रतीक आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी जिल्हा नियोजन मंडळ पाचाडच्या परिसरात भक्तनिवासाची सोय करेल. रायगड स्मारक मंडळाने जमविलेले दहा लाख रुपये इतर कामासाठी वापरावेत.''